Wednesday, November 19, 2008

शहाण्यांसाठी विचारांचा थोडा वेगळा चारा, अन वेडयांसाठी सुखावणारा गार गार वारा....

कधीतरी वेड्यागत वागायला हवे...
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...
उगाचच रातभर जागायला हवे
सुखासीन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुन्हा झाडायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

घरट्यात फ़ेकुनीया शाल कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजवायला हवे
छोटे मोठे दिवे फ़ुंकरीने मालवून
कधीतरी सुर्यावर जळायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

खोट्या खोट्या श्रुंगाराची लाली रंगवून
कशासाठी सजायचे चापून चोपून?
वरवर उडवत पदर जीण्याचा
गाणे गुलछबू कधी म्हणायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

भांड्यावर भांडे कधी भीडायला हवे,
उगाचच सखीवर चीडायला हवे
मुखातुन तीच्यावर पाखड्त आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

वीळीपरी कधी एक चंद्र्कोर घ्यावी
हिरवीशी स्वप्ने धारे धारेने चीरावी
कोर कोर चंद्र चंद्र हरता हरता
मनातुन पुर्णबींब त्यागायाला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

मनातल्या माकडाशी हात मिळ्वून
आचारावे कधीतरी वीचारावाचुन
झाडापास झोंबुनिया हाति येता फ़ळ
सहजपणे तेही फ़ेकायाला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

काही राती लावुनीया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायाला द्यावे
शोधुनिया प्राणातले दुमडलेले पान
मग त्याने आपल्याला छळायाला हवे...
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

ढगलासा कोट, छडी, विजार तोडकी
भटकायची चाल दैवासारखी फ़ेंगडी
जगण्याला यावी आशी विनोदाची जान
हसताना पापण्यांनी भीजायला हवे...
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

स्वत:ला विकून काय घेशील विकत?
खरी खरी सुखॆ राजा मिळतील फ़ुकट
हापापुन बाजारात मागशील किती?
स्वत:च काही नवे शोधायाला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

तेच तेच पाणी आणी तीच तीच हवा
आणी तुला बदलही कशासाठी हवा?
जुनेच आहे अजुन रियाजावाचून
गिळलेले आधी सारे पचायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...

नको बघु पाठीमागे येइल कळून
कितीतरी करायचे गेलेले राहुन
नको करु त्रागा असा उद्याच्या दारात
स्वत:ला कधी माफ़ करायला हवे.
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...